उन्हाळी भातशेती अंतिम टप्प्यात

अवकाळी पावसामुळे कापणीची कामे खोळंबली
कोलाड परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

कोलाड-खांब परिसरातील उन्हाळी भातशेती कामे अंतिम टप्प्यात आली असून, बळीराजा भातशेती कापण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेती कापायची की नाही, असा संभ्रम शेतकरीवर्गात निर्माण झाला असून, त्यांची चिंता अधिक वाढली आहे.

कोलाड-खांब परिसरातील काही भातशेती कोलाड पाटबंधारे खात्यामार्फत सोडण्यात येणार्‍या कालव्याच्या पाण्यावर करण्यात येते. यावर्षी भातशेतीला पाणीपुरवठा नियमित झाल्यामुळे भाताची पिके उत्तम प्रकारे तयार झाली आहे. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवार, दि.7 मेपासून एक आठवडाभर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी रोहा तालुक्याच्या काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे ही परिस्थिती अशीच राहील की काय, असा संभ्रम शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला आहे.

अगोदर भातशेती करण्यासाठी शेतकरी वर्गाला भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किंमती, नांगरणी व शेतमजूरी यांच्या वाढलेल्या किंमती यांच्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण झाला आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून मेहनतीतून भातपीक उत्तम प्रकारे तयार झाले आहे. परंतु, अवकाळी पाऊस केव्हा पडेल याचा भरोसा राहिलेला नाही, यामुळे भातकापणी करणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची परिस्थिती पूर्णपणे नष्ट व्हावी, अशीच प्रार्थना शेतकरी करीत आहेत.

Exit mobile version