भाताला आले मोड, मेहनत वाया; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
| कोलाड | प्रतिनिधी |
कोलाड खांब परिसरात पावसामुळे उन्हाळी भातशेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीयोग्य भातपीक पावसामुळे आडवे होऊन भाताला मोड आले आहेत. शेतकऱ्याची मेहनत वाया गेली असून, त्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कोलाड पाटबंधारे खात्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून पुई, पुगाव, मुठवली, शिरवली, खांब परिसरात उन्हाळी भातशेती केली जाते. मोठ्या मेहनतीने भातशेतीची लागवड केली गेली, भातपिकेही उत्तम प्रकारे आली. परंतु, भातकापणीच्या वेळी यावर्षी 6 मेपासून अवकाळी पाऊस सुरु झाला. आज पाऊस कमी होईल, उद्या कमी होईल, असे करून जवळ जवळ 20 दिवस झाले तरी अवकाळी पाऊस थांबेना. यामुळे भातकापणीला विलंब झाला व उभी असलेली भातपिके आडवी झाली. यामुळे या परिसरातील शेकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास क्षणात अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी भातपिके तयार होतात. शेतकरी वर्ग ही भातपिके मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापून, बांधून, झोडून पूर्ण करतात. जूनमध्ये पावसाळी पेरणी करतात. परंतु 6 मेपासून अवकाळी पाऊस सतत पडण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे कोलाड खांब परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्व भातपीक शेतामध्ये आडवे झाल्यामुळे ते वाया गेले आहे. सद्यःस्थितीत शेतकरी धास्तावला असून, पावसाळी भातपीकही घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लवकरच नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
30 हजार रुपये खर्च करून व इतर मेहनत करून भातशेती केली. भातपीकही उत्तम प्रकारे आले; परंतु सतत पडलेल्या पावसामुळे भातपीक जमीनदोस्त होऊन भाताला मोड आले आहेत. यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. भातपीक शेतात आडवे झाल्याने पावसाळी भातपीकही घेऊ शकत नाही. यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई मिळावी.
नथुराम कापसे,
शेतकरी,
मुठवली