उन्हाळी भात शेती बहरली

शेतकर्‍यांच्या हाती भरघोस पीक लागणार, मशागतीची कामे जोरात सुरु
| पाली । वार्ताहर ।
जिल्ह्यातील सुमारे 40 ते 50 हजार हेक्टर उन्हाळी भातशेती होते. सुधागड , माणगाव व रोहा परिसरात काही ठिकाणी कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती केली जाते. सध्या शेतकर्यांची उन्हाळी भात शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे. वाफ्यांमध्ये भाताची रोपे चांगली तरारली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती भरघोस पीक लागणार आहे.दीर्घकाळ राहिलेल्या पावसाने या वर्षी जिल्ह्यातील पावसाळी भातशेतीचे मोठे नुकसान केले. जमिनीत अधिक ओलावा राहिल्याने रब्बी हंगामातील कडधान्य शेतीचेही नुकसान झाले. त्यामुळे यंदा शेतकरी प्रत्येक शेतकामात अचूक नियोजन करीत आहे.
हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भातशेतीमधून शेतकर्यास हुकमी पिक मिळते. पावसाळ्यातील शेतीतून मिळणार्या उत्पादन व उत्पन्ना पेक्षा उन्हाळी शेतीतून अधिक चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी समाधानी असतात. काही शेतकरी तर पावसाळ्या एैवजी उन्हाळी शेती करण्यासच प्राधान्य देतात. सध्या या भात शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरु आहेत. शेती परिसरात पाणी व भात रोपांमुळे अधिक थंडावा निर्माण होतो. तसेच उन्हाचा तडाखा वाढल्यावर या भागात मात्र गारवा जाणवतो.

यावर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भात पिकाची पुरती वाट लावली. त्यात यावर्षी भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याने ऐन पीक तयार होण्याच्या काळात पाऊस पडल्याने भात पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍याचे भात पिकाचे 5 टक्के उत्पन्न घटल्याने लागवडचा खर्चही निघाला नाही. पीक कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकर्‍यांनी उन्हाळी भात शेतीची लागवड केली आहे.

स्थानिक जातीची लागवड उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत 184, कर्जत 3, कर्जत 4, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर-1 आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणार्‍या जातीचा वापर केला आहे. खरीप पिकापेक्षा उन्हाळी भात पीक अधिक येण्याची शेतकर्‍यांना आशा असल्याने उन्हाळी भात लागवडीकडे शेतकरी वळतो. त्यासाठी पावसाळी हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश काळ कमी असतो.

याउलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे खताला प्रतिसाद जास्त असतो आणि उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळेल. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आद्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही रोगाचे प्रमाण पावसाली भात पिकापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. तसेच पावासाळी भातापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते. भाताचे उत्पादन पावसाळीपेक्षा उन्हाळी हंगामात चांगले येईल, अशी आशा अनुभवी शेतकर्‍यांनी बोलून दाखवली

Exit mobile version