देशभरात सहा भीषण अपघातात 35 जणांचा बळी; महिला-मुलांचाही समावेश, अनेक जण गंभीर जखमी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सुट्टीचा रविवार अनेक कुटुंबांसाठी काळ बनून आल्याचे समोर आले आहे. देशातील विविध राज्यांत झालेल्या भीषण रस्ते अपघातांनी मृत्यूचे तांडव घातले. राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या दुर्घटनांमध्ये 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि तरुणांचाही समावेश आहे. एकाच दिवसात घडलेल्या या अपघातांनी देशातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वर दुहेरी मजली बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या या बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून, सहा जण जखमी झाले आहेत. बिहारमधील अथमलगोला येथे तिलक समारंभातून परतणाऱ्या स्कॉर्पिओला भरधाव वाहनाने धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. हरियाणातील करनाल येथे दोन वाहनांची धडक होऊन दोघांचा जीव गेला. गुजरातमधील कच्छ येथे भुज-खावडा महामार्गावर कार आणि भरधाव ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. हे कुटुंब रण ऑफ कच्छला भेट देऊन भुजकडे परतत होते. राजस्थानमधील जोधपूर येथे कार आणि प्रवासी वाहनाची धडक होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. गुजरातमधील एक कुटुंब रामदेवरा दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.
वेगाचा कहर, निष्काळजीपणाचा बळी!
या अपघातांमागे अतिवेग, चालकांचा थकवा आणि झोप, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेसारखी कारण्ो समोर येत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने, खड्डे, अपूर्ण बांधकाम, अपुरे दिशादर्शक आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव यामुळेही अपघातांचा धोका वाढत आहे.
