। मुरूड । वार्ताहर ।
मुरुडचे सनी रा. खेडेकर यांनी कराटे मधून अवघ्या 25 व्या वयातच तिसरी डिग्री प्राप्त केली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख प्रशिक्षकपदी व पश्चिम भारतात संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमी वयातच गगन भरारी घेणार्या सनीचे मुरुड तालुक्यातून नव्हे तर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केरळ येथील डॉ.आदित्य अनिल यांनी सनी खेडेकर यांची ब्लॅक बेल्टची परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन तालुक्याचे नाव लौकिक केले आहे. या परीक्षेमध्ये उत्तम प्रदर्शन करीत उत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या समोर कराटेची तिसरी डिग्री सनी खेडेकर यांना प्रदान करण्यात आली. दि. रियु-कियु शितो-रियु क्योकाई असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय तसेच संस्थेचे अध्यक्ष सोके केईबून ओहारा (ग्रँड मास्टर) यांनी डॉ. आदित्य अनिल (इंडिया चीफ) यांच्याकडे कराटेचे जपानवरून प्रमाणपत्र पाठवून दिले होते. ते प्रमाणपत्र सनी खेडेकर यांना प्रदान करण्यात आले. त्यांचे सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.