। पुणे । प्रतिनिधी ।
मला कधी कधी वाटतं, बरं झालं पक्ष फुटला. कारण या सगळ्या प्रकारानंतर एकतर ते तरी पक्षात राहिले असते किंवा मी तरी पक्षात राहिले असते. जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करु शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाताली राष्ट्रवादीची आढावा बैठक होती. या बैठकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव न घेता म्हटले आहे की, मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. ते या पक्षात असते आणि मी या पक्षात असते तर एक तर ते तरी राहिले असते किंवा मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही. तसेच, सगळया दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही, परंतु, संघटनेत आहे म्हणून बोलते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, जो पुरुष स्वत:ची बायको, आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर… एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी माईकवरही बोलेल. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. तसेच, मी विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही. मला नकोय ते कंत्राटदाराचे पैसे. माझं घर काही त्या कंत्राटाच्या पैशांवर चालत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.