उंबरे ग्रामपंचायतीला दिले पत्र
| खोपोली | प्रतिनिधी |
वडीलोपार्जित वहिवाटीच्या जागेचा वापर करून न देता ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप उंबरे येथील मुकुंद वाघुले यांनी केला होता. हे प्रकरण खालापूर न्यायालयात चालू असतानाच दि 16 आँगस्ट 24 रोजी तातडीच्या सुनावणीकामी व महत्त्वाचा आदेश मिळविण्याकामी बोर्डावर घेतलेले होते. वेळेत नोटीस देऊनसुध्दा तारखेस सुनावणीसाठी ग्रामपंचायत हजर राहिले नसल्यामुळे सदर प्रकरण पुढील सुनावणीकामी दि. 26 आँगस्ट 2024 रोजी नेमलेले आहे. तरी आपण मा. न्यायालयाच्या आदेशप्रमाणे बांधकाम त्वरीत थांबवावे अन्यथा न्यायालयाचे अवमान केल्याबद्दल ग्रामपंचायतीवर रितसर कायदेशिर कारवाई करणेत येईल. अशी नोटीस वाघुले यांचे वकील अॅड. अतुलकुमार देशकर यांनी खालापूर पं.स.आणि उंबरे ग्रामपंचायतीला दिली असल्याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार खालापूर तालुक्यातील उंबरे येथे आदिवासी समाजाची वस्ती आहे. या ठिकाणी मुकुंद वाघुले आपल्या कुटुंबासोबत राहतात. अनेक वर्षापासून वाघुले कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे. मुकुंद वाघुले यांचा घरासमोर वडीलोपार्जित वहिवाटीची जागा आहे. वाघुले यांच्याकडे रास्तभाव आणि रॉकेलचे दुकान आहे. घरातून अनेक वर्ष ते हे दुकान चालवतात. घरात लोकांची संख्या वाढल्याने त्यांनी घरासमोरील मोकळ्या जागेत दुकान बांधले होते. मात्र सदर जागा सरकारी असल्याचे कारण सांगत वाघुले यांनी उभारलेले शेड ग्रामपंचायतीने तोडले असल्याचे समजते.
दि. 17 आँगस्ट 2024 रोजी न्यायालयाने कोर्टानी वादीचा स्टेट्स को अर्ज मंजूर केला व त्यायोगे प्रतिवादी क्र.1 प्रतिवादी क्र. 2 यांना सर्व्हे नं.57/4 अ मौजे उंबरे, सतीमाळवाडी, पो. खांबेवाडी, ता. खालापूर, जि. रायगड येथे चालू केलेले बांधकाम थांबविणे करीता व सदरची जागा आहे त्या परिस्थितीमध्ये जतन करणेकरिता स्टेट्स को आदेश दि. 17 आँगस्ट 2024 पासून ते दि. 26 आँगस्ट 2024 पर्यंत पारित केलेला असल्याचे वाघुले यांचे वकील अँड. देशकर यांनी सांगितले आहे.