। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिळकतखार येथील सरपंचासह दोन सदस्यांनी वन विभागाच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचे वृत्त ‘कृषीवल’ने प्रसिद्ध केल्यावर धनदांडग्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. धनदांडग्यांनी अभय मिळावे, याकरिता वन विभागाच्या अधिकार्यांनाच हाताशी धरले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘कृषीवल’ने आवाज उठविताच वन विभागाने मंगळवारी (दि.4) शेतकर्यांवर कारवाई करीत त्यांचे गोठे तात्काळ हटविण्याचे आदेश दिले. मात्र, वन विभागाच्या जमिनीवरील धनदांडग्यांचे हॉटेल, ढाबे तसेच अन्य व्यवसायाबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने वन विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
मिळकतखार येथील वन जमिनीमध्ये गोरख कडवे, अभिजीत कडवेसह तिघांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी सिमेंट विटांचे बांधकाम केल्याचा आरोप व तक्रार स्थानिक ग्रामस्थ जगदीश म्हात्रे यांनी केला आहे. त्यांना दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वन विभागतर्फे गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमणाबाबचा कबुलनामा गोरख कडवे, अभिजीत कडवे यांनी वन अधिकार्यांसमोर दिला आहे. असे असतानाही त्यांचे बांधकाम पाडण्याबाबत वन विभाग कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. मिळकखार येथे वन विभागाच्या स.नं. 186/अ, ग.नं. 537 या जागेत बेकायदेषीररित्या होड्या बनविणे, ढाबा व्यवसाय, हॉटेल, चायनीज दुकाने, सलुन अशी अनेक दुकाने आहेत. या अनधिकृत दुकानांना विद्यूत पुरवठा करू नये व केला असल्यास त्वरीत तोडून टाकावा, असे पत्र कनकेश्वरमधील परिक्षेत्र वन अधिकारी यांनी मांडवा विद्यूत मंडळाच्या कनिष्ठ अभियंता यांना दि.1 नोव्हेंबर 2017 रोजी दिले आहे. सावंत यांनी याबाबत रेवसचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे चौकशी केली असता त्या दिड वर्षापूर्वीच हजर झाल्या असून याबाबत माहिती घेवून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी सावंत यांना दिले आहे. दरम्यान, मिळकतखार येथील वन विभागाच्या जमिनीवर अंबर पंढरीनाथ नाखवा, गौरख दशरथ कडवे, वसंत काशिनाथ पाटील, जयंत शांताराम कडवे, आकाश बाळाराम कडवे, अभिजीत अजित कडवे, अर्जुन गणपत्त ठोंबरे, रोहिदास हरिश्चद्र कडवे, सरिता रामनाथ कडवे, कृष्णा काशिनाथ पाटील, अमृता अरविंद ठोंबरे, रमाकांत मोतीराम कडवे, गणपत दत्तु ठोंबरे, स्वप्नील अशोक कड़वे, ग्रामपंचायत मिळकतखार, वैष्णवी वसंत पाटील, सुरज गणेश म्हात्रे, मधुकर एकनाथ म्हात्रे, मधुकर एकनाथ म्हात्रे, स्वप्नील अशोक कडवे, गोरख दशरथ कड़वे, आत्माराम नारायण कोळी, अजिंक्य दिलीप ठोंबरे व उमेश दशरथ ठोंबरे यांनी अतिक्रमण केले असून त्यांच्यावर वन विभागातमर्फे गुन्हे दाखल आहेत.
शेतकर्यांना धरले वेठीस
एकूण 24 अतिक्रमणे वन जमिनीवर झाली असताना वन विभागाने गुरांचे गोठे बांधलेल्या अजिंक्य दिलीप ठोंबरे व उमेश दशरथ ठोंबरे या दोनच गरिब शेतकर्यांविरूध्द नोटीस बजावून त्यांना तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बेकायदेशीररित्या होड्या बनविणे, ढाबा, हॉटेल, चायनीज, सलुन आदी व्यवसायिक दुकाने वनजमिनीवर थाटणार्या धनदांडग्यांना मोकळे सोडले आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.
शेतीच्या गरजेेसाठी गुरांचे गोठे वनविभागात बांधल्याबाबत गरीब शेतकर्यांना वनविभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. शेतकर्यांनी अतिक्रमण केले असेल तर ते नियमाप्रमाणे दूर करण्यास हरकत नाही. कारवाईचे नियम सर्वांना समान असावेत. एक-दोन शेतकर्यांना राजकीय दबावाखाली टार्गेट करू नका.
संजय सावंत,
सामाजिक कार्यकर्ते