बंबई पाडा परिसरात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला

। पनवेल । प्रतिनिधी ।

तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी (दि.3) सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरून महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंबई पाडा येथील रहिवाशांना सकाळच्या सुमारास संबंधित महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांवरून हा खून गळा आवळून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारण किंवा इतर कोणता गुन्हेगारी हेतू याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांकडूनही चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे बंबई पाडा परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version