| पोलादपूर | प्रतिनिधी |
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मधील जवान प्रशांत प्रकाश कदम (42) यांचा ड्युटीवर परतताना संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलादपूर तालुका येथील कणगुले हे त्यांचे मूळ गाव असून, सध्या ते तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास होते.
27 मार्च रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे ड्युटीसाठी निघाल्यानंतर लोणावळ्यापर्यंत पोहोचल्याची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. पुढील तीन दिवसांनी कर्जत तालुका परिसरातील सोमाटणे फाटा येथे ते जखमी अवस्थेत आढळले असून, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मृत्यू अपघाती असल्याचे सांगितले जात असले तरी पत्नी रूपज्योती कदम, वडील प्रकाश कदम आणि आई सुनीता कदम यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. जवानाचा मोबाईल, ओळखपत्र व बॅग बेपत्ता असल्याने तसेच शवविच्छेदन अहवालातील जखमांमुळे संशय अधिक बळावला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबियांनी केली असून, पुढील तपासाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सीआरपीएफ जवानाचा संशयास्पद मृत्यू
