| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत शितोळे आदिवासीवाडी, हमरापूर फाटा परिसरातील टेकडीवरील झाडीझुडपात एका 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची ओळख आंबी जान्या जाधव (35) रा. भोगुर्ली, महालमिर्या डोंगर, ता. पेण अशी झाली आहे. संबंधित महिला काही दिवसांपासून पती व आई-वडिलांपासून वेगळी राहत असून, स्वतःहून पेण येथे आली होती. सोमवारी (8) मुंबई-गोवा महामार्गालगतच्या झाडीझुडपात तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
मृत महिलेच्या भावाने पेण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून महिलेच्या तोंडावर कठीण वस्तूने वार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत झाडीत टाकून आरोपी फरार झाल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून पुरावे संकलित केले आहेत. झाडीझुडप परिसरासह विविध अंगांनी तपास सुरू असून, उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुंड त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल अधिकचा तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे हमरापूर फाटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







