| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्यावतीने चौदा वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी रिलायन्स लोधीवली संघाचा सलामीवीर तंत्रशुद्ध फलंदाज सुयश पारंगे व मधल्या फळातील फलंदाज शुभंकर माने यांनी नाबाद शतके झळकावत संघाला विजय मिळवून दिला आहे. पनवेल येथील जुई कामोठेच्या आई एकवीरा क्रिकेट मैदानावर एसएसपी क्रिकेट अकॅडमी नेरळ विरुद्ध कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी रिलायन्स लोधीवली संघांमध्ये सामना खेळविण्यात आला. त्यामध्ये कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमीच्या संघाने प्रथम फलंदाजी करतांना निर्धारित 40 षटकांमध्ये 2 गडी बाद 280 धावसंख्या उभारली होती. संघाचा सलामीवीर तंत्रशुद्ध फलंदाज सुयश पारंगे यांनी नाबाद 118 धावा ठोकल्या, तर मधल्या फळीत शुभंकर माने यांनी नाबाद 116 धावा काढून संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. 280 धावांचा पाठलाग करतांना एसएसपी क्रिकेट अकॅडमी नेरळ संघाचा डाव 24 व्या षटकात अवघ्या 63 धावांवर आटोपला. कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमीकडून दिशांन कांबळे, स्वाभिमान बेज व तन्मय म्हात्रे यांनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद करत संघाला विजय मिळवून दिला. संघाचे प्रशिक्षक राजेंद्र कोंढाळकर व समीर सुर्वे यांनी संघातील खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुयश, शुभंकरची शतकी खेळी
