| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नेरुळ पूर्व आणि पश्चिम रेल्वे परिसरात मद्यपी आणि अवैध धंद्यांनी अतिरेक केला असून, याविरोधात स्वराज पक्ष आक्रमक झाला आहे. सदर मद्यपी आणि अवैध धंदे करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आता जागरूक नागरिकांच्या सहकार्याने स्वाक्षरी मोहीम दि. 19 आणि 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत रेल्वे परिसरात राबविण्यात येणार असल्याचे स्वराज पक्ष, नवी मुंबई उपाध्यक्ष स्वप्निल घोलप यांनी सांगितले.
नेरुळ पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात दिवस-रात्र मद्यपी यांनी थैमान घातले आहे. दारू पिऊन शिवीगाळ, मारामारी आणि महिलांची छेडछाड असे प्रकार नियमित घडत आहेत. या रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी मद्यपी दारूच्या दुकानातून दारू विकत घेऊन जवळच असलेल्या पार्किंगमध्ये रेल्वे परिसर भिंत आदी ठिकाणी खुलेआम मद्यप्राशन करतात. त्याचबरोबर या ठिकाणी गर्दुल्ले व अमली पदार्थांचे सेवन करणार्यांचा वावर वाढत असल्याने येथून जाणार्या महिला व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकाराला आळा बसावा यासाठी स्वराज पक्ष मागील दीड वर्षांपासून स्थानिक पोलीस, सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. तसेच पोलीस चौकी निर्माण करण्याची मागणीदेखील केली आहे. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने स्वाक्षरी मोहीम दि. 19 आणि 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत रेल्वे परिसरात राबविण्यात येणार आहे. सह्यांचे निवेदन आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांना देणार असून, पुढील आठ दिवसांत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्वप्नील घोलप यांनी दिला आहे.