प्राणीमित्रांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
| पनवेल | वार्ताहर |
प्राण्यांशी क्रूरतेने वागणार्यांवर कायद्यात नमूद कलमानुसार कारवाई करण्याची मागणी प्राणी हक्क कार्यकर्ते उत्पल खोत यांनी पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांची भेट घेऊन केली आहे. यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसनकर यांनी काढलेल्या प्राण्याच्या संरक्षणाच्या परिपत्रकाचा दाखला देत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीदेखील अशाच प्रकारचे परिपत्रक काढण्याची विनंती खोत यांनी केली आहे.
यावेळी खोत यांच्या सोबत सीमा तांक या प्राणी हक्क कार्यकर्त्या उपस्थित होत्या.सणासुदीला प्राण्यांवर अत्याचार वाढत असतात. विशेषतः उत्सवाच्या काळात फटाके फोडताना काही जण जाणीवपूर्वक प्राण्यांना इजा पोहचवत असतात. तसेच काही जण रस्त्यावरील प्राण्यांना विनाकारण दगडाने अथवा हातातील वस्तुने मारून इजा पोहचविण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांना कायद्यांत सरंक्षण आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 नुसार अशा घटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नागरिकांना याबाबत माहिती व्हावी या हेतूने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने परिपत्रक काढल्यास नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असे मत उत्पल खोत यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई परिसरात प्राणी हक्कासाठी काम करणार्या हजारपेक्षा जास्त प्राणीमित्रांचे प्रतिनिधी म्हणून उत्पल खोत आणि सीमा ताक यांनी पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांची भेट घेतली.आयुक्त सिंग यांनी प्राणी हक्क कार्यकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करत उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले.
जाणीवपूर्वक त्रास देणार्यांवर गुन्हे दाखल करा
काही वेळेला अनवधानाने प्राण्यांना इजा होते. मात्र, जाणीवपूर्वक प्राण्यांना त्रास देणार्या घटकांवर कायद्यात नमूद तरतुदीनुसार गुन्हे दाखल करा, अशी विनंती उत्पल खोत यांनी केली.