प्रीतम म्हात्रेंकडून आयुक्तांना आवाहन
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्राला लागूनच असलेल्या नवी मुंबई शहर परिसरात डेंगू, मलेरिया सारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. पावसाळ्याचे दिवस, सततचे हवामान बदल तसेच अनेक ठिकाणी होणारी बांधकाम विकासकामे यामुळे पनवेल महानगरपालिका परिसरात डेंग्यू, मलेरिया व इतर आजारात रुग्णांची वाढ होऊ शकते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घेऊन वैद्यकीयदृष्ट्या उपाययोजना राबवाव्यात आणि नागरिकांनाही ठिकठिकाणी खबरदारी घेण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरली असून, संशयित पेशंटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. घणसोली गावात डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला 30 ते 40 रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सध्या पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरात पावसामुळे गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या सांडपाण्यावर डेंग्यूच्या डासांची पैदास देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होते. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेमार्फत धुरीकरण व औषध फवारणी करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेच्यावतीने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.
पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या महापालिकेमध्ये प्रशासन सर्व यंत्रणा सांभाळते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी उणीव जाणवते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासाबद्दल आपण अगोदरच नियोजन केले तर नक्कीच पनवेलमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढणार नाहीत. आयुक्तांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलावी अशा प्रकारे मी मागणी केली आहे आणि त्याचा पाठपुरावाही घेणार आहे.
प्रीतम म्हात्रे