| अलिबाग | प्रतिनिधी |
फेरफार उतारा देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरोधात कारवाई करीत रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी 26 जूलै रोजी करण्यात आली.
संतोष मनोहर चांदोरकर (वय 43 ) असे या तलाठ्याचे नाव आहे. हा तलाठी रोहा येथील रहिवासी आहे. रोहा तालुक्यातील भालगाव येथे तलाठी म्हणून त्याची नियुक्ती होती. सध्या अतिरिक्त कार्यभार वाली येथे होता. तक्रादाराने गट नं. 783 मधील क्षेत्र 01- 99- 00 या जमीनीचे फेरफार नोंद मंजूरीसाठी अर्ज केला होता. फेरफार नोंद मंजूर झाल्यानंतर तलाठ्याकडे उताऱ्याची मागणी केली. परंतु या तलाठ्याने 30 मे 2023 रोजी दहा हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, कौस्तूभ मगर, जितेंद्र पाटील, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील या पथकाने पडताळणी केली.
पडताळणीमध्ये दहा हजार रुपयांची मागणी केल्याबरोबरच ती रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे 26 जूलै रोजी संतोष चांदोरकर या तलाठ्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वीदेखील महाड शहर पोलीस ठाणेमध्ये 2016 व 2019 मध्ये लाच प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.