| सांगोला | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाने कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने भाजपच्या पाठिंबाबाबतची चर्चा आहे ती खोटी असून, मला बदनाम करण्याचा कट असल्याचे मत शेकापचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. जर कोणाला पाठिंबा द्यायचा असेल, तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांना आहे. मी पक्षाचा पाईक आहे, पक्ष जो निर्णय घेईल, तो मलाही बंधनकारक असणार आहे, असेही आ. देशमुख म्हणाले.
सध्या मुंबईमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडीला उधाण आले असून, त्यामध्ये सांगोल्याचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियावर सांगण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मत व्यक्त केले.
महायुतीला व विशेषतः भाजपला मोठे यश मिळाले आहे, त्यामुळे ते आमच्याशी कसे बोलतील. जर बहुमतासाठी गरज असती, तर ते आमच्या पक्षाशी बोलले असते. त्यांना बहुमत मिळाले आहे. सध्या जे काही प्रसिद्ध होत आहे, ते मला बदनाम करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करीत असेल, असे मला वाटत असल्याचेही आ. देशमुख यांनी सांगितले.