| उरण | वार्ताहर |
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. महायुतीला घवघवीत यश मिळाले, तर महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला आहे. तसेच आगामी होणार्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी महाविकास आघाडी व पराभूत उमेदवारांकडून जोर धरू लागली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील काही महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जात आहे. अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या. तो राज्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात आहे.