रसायनी | वार्ताहर |
तळवली माणिकनगर परिसरातील अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गौरी गडगे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीकडून हायमॅक्स दिवे लावून परिसर प्रकाशमय केला आहे. माणिकनगर परीसरातील चौकात अंधारच अंधार असल्याने नागरिकांना विशेषतः महिलावर्गाला या परिसरातून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी सरपंच गौरी महादेव गडगे, ग्रामपंचायत सदस्य संदेश जगन्नाथ माळकर यांना सदर समस्या सोडविण्याची मागणी केली होती.
त्यानुसार वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सेस फंडातून तळवली माणिकनगर येथे हायमास्ट बसविण्यात आले. या हायमॅक्सचे उद्घाटन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदेश माळकर, मदन ठोंबरे, शिवाजी शिंदे आदींसह माणिकनगर ग्रामस्थ उपस्थित होते. तळवली माणिकनगरजवळचा परिसर हायमॅक्स दिव्यांनी उजळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.