निसर्ग अन् मानवी नात्याचे सुंदर मिश्रण; पुणे-कोकण या दोन संस्कृतींचा सेतू
| माणगाव | सलीम शेख |
पुणे आणि कोकणाला जोडणारा ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाचे साक्षात सौंदर्यस्थळ. पावसाळा सुरू झाला की, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून उगवणारे धबधबे, ढगांच्या कुशीत हरवलेली शिखरे, हिरव्यागार दऱ्या आणि गूढ शांतता या सगळ्याचे एक विलक्षण जादूई जग ताम्हिणी घाटात फुलते. त्यामुळे ताम्हिणी घाट हा केवळ पर्यटनासाठीचा मार्ग नाही, तर तो पुणे-कोकण या दोन संस्कृतींचा सेतू आहे. कोकणातील लोक या घाटामार्गे पुण्याकडे शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी जातात, तर पुण्याचे लोक निसर्गाच्या सान्निध्यासाठी या घाटात रममाण होतात. या मार्गाने प्रवास करताना सह्याद्री आपल्याशी थेट संवाद साधतो. प्रत्येक वळणावर तो नवे रहस्य उलगडतो.
कोकणचे कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी 1981मध्ये रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा माणगाव-ताम्हिणी घाट-पुणे हा राज्य मार्ग मंजूर केला होता. मात्र, वनविभागाने पर्यावरणाचे संरक्षणाचे कारण देत 20 वर्षे अडथळा निर्माण केला होता. तत्कालीन आमदार अशोक दादा साबळे यांनी पाठपुरावा केला. मात्र, सुनील तटकरे आमदार आणि पुढे मंत्री झाल्यावर अनेक अडथळे दूर करून यशस्वीपणे मार्गक्रमण करत हा राजमार्ग 2001 मध्ये प्रत्यक्षात सुरू करुन अंतुले यांचे स्वप्न साकार केले. त्यानंतर 2019मध्ये दिघी-माणगाव-पुणे या महामार्गाचे दुपदरीकरण केल्यावर पर्यटकांची वर्दळ आणखी वाढली. तसेच, ताम्हिणी घाट हा केवळ एक मार्ग नसून सह्याद्रीच्या आत्म्याचा श्वास आहे. येथे निसर्ग, संस्कृती आणि मानवी नात्याचे सुंदर मिश्रण आहे.
विकासाचा मार्ग अन् जबाबदारी
अलीकडील काळात ताम्हिणी घाटाचा रस्ता सुधारला गेला, नवे पूल आणि सुरक्षा भिंती बांधल्या गेल्या. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित झाला असला, तरी वाढत्या वाहनांमुळे कचरा, प्लास्टिक आणि ध्वनह प्रदूषण वाढू लागले आहे. आपण निसर्गाचा आनंद घेताना त्याला इजा पोहोचवू नये. ही जाणीव प्रत्येक प्रवाशामध्ये असायला हवी. “निसर्ग तुमचा पाहुणा नाही, तो तुमचा घरचा आहे” हे समजणं काळाची गरज आहे.
सोयी-सुविधांचा अभाव
या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यात अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. शासकीय विश्रामगृह नव्याने बांधण्यात यावीत. वळणांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. ठिक ठिकाणी प्रसाधनगृहे आणि शौचालये बांधण्यात यावीत. अवघड आणि तीव्र उताराच्या ठिकाणी मजबूत लोखंडी कठडे उभारण्यात यावेत. रुग्णवाहिका ठेवण्यात यावी. भविष्यात हा महामार्ग चौपदरी करण्यात यावा, अशा विविध मागण्या प्रवाशी आणि पर्यटकांनी केल्या आहेत.
