। सावंतवाडी । प्रतिनिधी ।
दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील 12 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातली आहे. त्यानुसार अवैध होणार्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्याकामी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील जनहित याचिकेमध्ये 5 डिसेंबर 2018 व 22 मार्चच्या आदेशान्वये या समितीत महसूल, वन, पोलिस विभागांतील अधिकार्यांचा समावेश आहे.
या समितीत वृक्षतोडीस प्रतिबंधित क्षेत्रात संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंधाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिद्धी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जाणार आहे. दोडामार्ग तालुक्यात खासगी मालकी वा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड निदर्शनास आल्यास जनतेने गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळवावे. वनविभागाकडील अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी जाऊन तत्काळ चौकशी करून आवश्यक कार्यवाही करतील. समितीच्या ई-मेलवर ऑनलाईन तक्रार दाखल करता येते. सावंतवाडी वनविभाग यांच्याकडे दूरध्वनीवरूनही तक्रार दाखल करता येणार आहे.