तटकरे-थोरवे वाद न्यायालयात; 65 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात तब्बल 65 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा माणगाव सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांची लढत आता थेट न्यायालयीन पातळीवर पोहोचली आहे.
खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर 26 डिसेंबर रोजी शिवसैनिक मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली होती. ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती आणि त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे आपली राजकीय प्रतिमा मलीन झाली तसेच जनतेत चुकीचा संदेश गेला, असा दावा करत तटकरे यांनी थोरवे यांच्याविरोधात 65 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
या प्रकरणाची पहिली सुनावणी माणगाव सत्र न्यायालयात पार पडली असून, पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती तटकरे यांचे वकील ॲड. प्रदीप पाटील यांनी दिली. दरम्यान, या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. एकीकडे मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेली संवेदनशील परिस्थिती आणि दुसरीकडे प्रमुख राजकीय नेत्यांमधील थेट न्यायालयीन संघर्ष यामुळे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये तीव्र राजकीय ध्रुवीकरण दिसून येत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, या प्रकरणाचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे. आरोप-प्रत्यारोपांची लढत आता न्यायालयात पोहोचल्याने दोन्ही बाजूंकडून राजकीय रणनीती अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरण, त्यानंतर झालेली राजकीय वक्तव्ये आणि आता दाखल झालेला अब्रूनुकसानीचा दावा या सर्व घटनांमुळे रायगड जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. दरम्यान, खा. सुनील तटकरे यांनी दाखल केलेल्या या दाव्यामुळे राजकीय नेत्यांकडून किंवा समाजमाध्यमांवरून बिनबुडाचे आरोप व बेताल वक्तव्ये करण्यावर काही प्रमाणात पायबंद बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
