टॅक्सी चालकांचे उपोषण स्थगित

अनधिकृत प्रवासी वाहनांवर कारवाई करणार

| नेरळ | वार्ताहर |

महाराष्ट्र दिनापासून नेरळ कळंब रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणार्‍या टॅक्सी चालक यांनी खासगी प्रवासी वाहनांच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने सुरू केलेले उपोषण नेरळ पोलीस ठाणे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे तिसर्‍या दिवशी सुटले असून प्रादेशिक परिवहन विभागाने अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्याची मागणी मान्य केल्याने हे उपोषण तिसर्‍या दिवशी स्थगित करण्यात आले.

श्री अष्टविनायक टैक्सी चालक मालक संघटनेच्या महाराष्ट्र दिनापासून नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील कोल्हारे साई मंदिर येथे उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे वतीने जाहीर पत्रक काढून तर अन्य राजकीय पक्षांनी उपोषण स्थळी भेट देवून पाठिंबा दिला होता. 28 सभासद हे या मार्गावर टॅक्सी चालवत असतात आणि त्यामुळे त्यांनी दररोज दिवसभर पाच आणि रात्री पाच असे चालक उपोषण करीत होते. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी प्रादेशिक परिवहन मोटार वाहन अधिकारी संदीप कोटेकर यांनी रस्त्यावर गाडी उभी करून गाडीमधून उपोषण कर्त्यांना उपोषण सोडण्याची सूचना केली होती. मात्र उपोषण कर्ते हे लेखी आश्‍वासन आणि कारवाई या मागणीवर ठाम असल्याने रात्री नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी उपोषण कर्त्यांना उन्हाचा त्रास लक्षात घेवून आपण मध्यस्थी करतो असे सांगून उपोषण तिसर्‍या दिवशी थांबवा अशी सूचना केली होती.

बुधवारी तिसर्‍या दिवशी नेरळ पोलीस ठाण्याच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक प्रादेशिक अधिकारी निलेश धोटे आणि मोटार वाहन अधिकारी संजय पाटील हे दुपारी उपोषण स्थळी पोहचले. त्यांनी उपोषण कर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करीत असल्याचे उपोषणकर्ते यांनी जाहीर केल्याने तीन दिवस सुरू असलेले उपोषण आज दुपारी अडीच वाजता स्थगित करण्यात आले.

Exit mobile version