| रायगड | प्रतिनिधी |
शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढ आणि शैक्षणिक विषयांचे विचारमंथन यासाठी चौल केंद्र शाळेमध्ये शिक्षकांची शिक्षक परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेमध्ये शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आलेख मांडला. विविध शैक्षणिक बाबींचा आढावा, शिष्यवृत्ती विषयी सविस्तर मार्गदर्शन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्ननिर्मिती, पायाभूत साक्षरता, हसत खेळत तणाव मुक्ती आदी विषयांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्रप्रमुख रवींद्र थळे यांनी विविध शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. अहवाल वाचन च संदीप पाटील यांनी केले. सरोज पाटील यांनी शिष्यवृत्ती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्ननिर्मिती कशी करावी हे महेश वेरूळे यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. पायाभूत साक्षरता या विषयावर रचना साळुंके यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्याप्रवेश हा विषय रश्मी क्षीरसागर यांनी समजावून सांगितला. पाठ्यपुस्तकातील कवितांचे आपल्या सुमधुर आवाजात नम्रता महाले यांनी गायन केले. केंद्रप्रमुख रवींद्र थळे यांनी हसत खेळत तणाव मुक्ती या विषयावर आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले.