| रायगड | प्रतिनिधी |
शाळांमध्ये सहामाही परीक्षा संपून दिवाळीच्या सुटीचे वेध लागले असताना आता 1967 पूर्वीच्या मराठा कुणबी, मराठा विद्यार्थ्यांचे दाखले, नोंदी शोधण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आता शाळेतील जुनी कागदपत्रे, नोंदी काढून शोध घ्यावा लागणार असून, वेळेत काम पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या सुटीतही शाळेत येऊन काम करावे लागत असल्याने शिक्षकांची दिवाळी आरक्षणाच्या नोंदी शोधण्यात गेली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. तसेच मराठा समाजाला मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील शाळांतील 1967पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठा, मराठा, कुणबी असल्याचे दाखले, नोंदी शोधण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. शाळांमध्ये सहामाही परीक्षा असतानाही शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणुकीची कामे करावी लागली. त्यात आता कुणबी नोंदणी शोधण्यासाठी 60 वर्षांपूर्वीची कागदपत्रे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या कामाचा शिक्षकांवर ताण पडणार आहे. दिवाळीची सुटी लक्षात घेऊन अनेकांनी गावी जाणे, सहलीला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, तातडीचे काम आल्याने आता सर्व नियोजन कोलमडणार आहे. तसेच त्यात काही चुका, उणिवा राहिल्यास, विलंब झाल्यास त्याचाही मनस्ताप शिक्षकांनाच सहन करावा लागणार आहे, असे काही शिक्षकांनी सांगितले. मोडी लिपी, सीमा भागात अन्य भाषा येणाऱ्यांची गरज अनेक जुनी कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे जुन्या नोंदी शोधण्यासाठी आता मोडी लिपी वाचता येणाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच सीमेवरील गावांमध्ये त्या भाषा येणाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.
जिल्ह्यात सर्व शासकीय विभागाच्यावतीने महसूल अभिलेखे खसारा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर, सन वही व सातबारा उतार, 1951 नमुना नंबर 1, नमुना नंबर 2, हक्क नोंद, जन्म-मृत्यु रजिस्टर गाव नमुना क्रमांक 14, शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही-जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अभिलेखे अनुन्याप्ती नोंद वह्या, मळी नोंद वही, ताडी नोंदवही अस्थापना अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेखे रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही, पोलीस विभाग गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफआयआर रजिस्टर, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी रजिस्टर, डे बुक करार खत, साठेखत, इसार पावती भाडे चिट्ठी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्र, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र ई दस्त, भूमि अभिलेख विभाग पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासेस रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वफ्फ अधिकारी यांचे कडील मुंतखब, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील सन 1967 पूर्वीचे कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे आदींची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व अभिलेख तसेच तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी तपासणी करण्यात येणार आहे.