। रसायनी । वार्ताहर ।
स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक शाळेत बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड तथा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हनुमानजी गुप्ता यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयराम म्हात्रे व कांचन म्हात्रे यांच्या संगीत साथीने विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले.
विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक, प्राथमिक विद्यामंदिर चौक व विद्यामंदिर सारंग शाळेतील 48 शिक्षक बंधू भगिनींचे भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. सुवर्णा मोरे व मुकुंद वरुडे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. बिर्ला कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाश देसाई व युनिट हेड हनुमान गुप्ता यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करुन शिक्षकांच्या कार्याची स्तुती करून त्यांना प्रोत्साहित केले. सदर प्रसंगी कंपनीचे मॅनेजर सचिन कंदळे, सी.एस.आर प्रमुख लक्ष्मण मोरे, संस्थेच्या संचालिका तथा प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक भोमले, उपमुख्याध्यापिका पुजारी, पर्यवेक्षक मोळीक, कांबळे डी. एस. आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल बडेकर तर आभार प्रदर्शन शरद कुंभार यांनी केले.