| म्हसळा | प्रतिनिधी |
मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत बीएलओ म्हणून काम करणाऱ्या म्हसळा तालुक्यातील शिक्षकांनी अतिरिक्त कामाच्या वाढत्या ताणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मतदार यादी पुनरिक्षणाला विरोध नसला, तरी या कामाच्या नावाखाली होणारा मानसिक त्रास थांबवावा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मोकळे करावे, अशी मागणी शिक्षकांनी पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांच्याकडे केली.
शिक्षकांनी सांगितले की, बीएलओ म्हणून सलग सहा दिवस क्षेत्रीय काम करावे लागत असून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्यास भाग पाडले जात आहे. शाळेतील अध्यापन, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना हा अतिरिक्त ताण सहन करणे कठीण होत असल्याने मानसिक आणि शारीरिक त्रास वाढत आहे. महसूल विभागाकडून शाळेचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी एसआयआरचे काम करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. याशिवाय शाळेच्या वेळेत तहसील कार्यालय व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे वारंवार फोन येत असल्याने अध्यापनात व्यत्यय येत आहे. ”आम्हाला मानसिक त्रास देऊ नका, मुलांना शिकवू द्या,”अशी आर्त हाक शिक्षकांनी यावेळी दिली. यावर सभापती बबन मनवे यांनी शिक्षकांच्या समस्या तहसीलदारांसमोर मांडून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपसभापती लहू म्हात्रे तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते.







