| हरारे | वृत्तसंस्था |
टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्स मात केली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 53 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 41.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. भारताची ही अंतिम फेरीत पोहचण्याची सलग सहावी आणि एकूण दहावी वेळ ठरली. ॲरॉन जॉर्ज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
ॲरॉनने शतक झळकावलं. तर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. अफगाणिस्तानने टॉस जिंकला. अऱफगाणिस्तानच्या कॅप्टनने बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानसाठी उझैरुल्ला नियाझाई आणि फैसल शिनोजादा या जोडीने शतक झळकावलं. त्यामुळे अफगाणिस्तानला 300 पार पोहचता आलं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 310 धावा केल्या. फैसलने 93 बॉलमध्ये 110 रन्स केल्या. तर उझैरुल्ला याने नाबाद 101 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 208 धावांची विक्रमी भागीदारी केली.
भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात झाली. ॲरॉन जॉर्ज आणि स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी या जोडीने 90 धावांची भागीदारी केली. वैभवने 33 चेंडूत 68 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन आयुष म्हात्रे याने 59 बॉलमध्ये 62 रन्स केल्या. त्यानंतर आयुष आऊट झाला. ॲरॉन जॉर्ज भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ॲरॉनने केलेल्या या खेळीमुळे भारताला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत सर्वोच्च धावसंख्येचा सहज यशस्वी पाठलाग करता आला. ॲरॉनने 104 बॉलमध्ये 115 धावा केल्या. ॲरॉनेन या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकार लगावले.
दरम्यान आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने मंगळवारी 3 फेब्रुवारीला गतविजेता ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उभयसंघातील महाअंतिम सामन्याचा थरार हा शुक्रवारी 6 फेब्रुवारीला रंगणार आहे. आता या महाअंतिम सामन्यात कोण जिंकणार? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.







