। नेरळ । प्रतिनिधी ।
कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत,त्यामुळे गेली काही वर्षे कर्जत तालुक्यातील नेरळ येथे कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार्या करिअर एजुकेशन ट्रेनिंग स्कूलसाठी स्कुल साठी मुंबई येथील सिमेन्स ऐक्य एजुकेशन आणि वेल्फेअर ट्रस्ट यांनी सामंजस्य करार केला आहे. त्यातून मुंबई ऊर्जा साठी तंत्रज्ञ घडविण्याचे काम केले जाणार आहे. नेरळ जवळील कोल्हारे येथील करिअर एजुकेशन ट्रेनिंग स्कूलमध्ये हा सोहळा पार पडला. त्यावेळी मुंबई ऊर्जाचे प्रकल्प संचालक निनाद पितळे यांनी कुशलय विकास ची क्षमता वाढल्यास मुंबई ऊर्जासाठी अधिक तंत्रज्ञ मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई ऊर्जा मार्ग या मुंबईतील आगामी महत्त्वपूर्ण पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्पाने मुंबई आणि उपनगरातील तरूणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यासाठी सिमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टसोबत सहयोग केल्याची घोषणा केली.मुंबई ऊर्जा चे प्रकल्प संचालक निनाद पितळे यांच्यासह सिमेन्स ऐक्य एजुकेशनचे अध्यक्ष गिरीश अष्टेकर,यांच्यासह मुंबई येथील राजेश शर्मा,अविनाश भोपी,अशोक राणे,हरेश धुळे,आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
200 तरुणांना प्रशिक्षण
सरकारच्या कौशल भारत-कुशल भारतफ दृष्टीकोनाशी संलग्न असलेल्या या उपक्रमाचा मुंबई महानगर प्रदेशामधील 200 हून अधिक तरूणांना टप्प्याटप्प्यांनी प्रशिक्षित करण्याचा मनसुबा असेल. त्यांना नोकरीसाठी सुसज्ज करण्याच्या मनसुब्यासह हा प्रशिक्षण उपक्रम तरूणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी देईल, ज्यामुळे त्यांना स्थिर उदरनिर्वाह संधी मिळवण्यामध्ये साह्य होऊ शकते.
या प्रशिक्षण उपक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये 20 विद्यार्थ्यांचा समावेश असेल, ज्यांची प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून निवड करण्यात येईल. निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना तीन आठवडे काटेकोरपणे प्रशिक्षण देण्यात येईल, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल प्रशिक्षणाचे मुलभूत ज्ञान संपादित करण्यासाठी व्यावहारिक व सैद्धांतिक मॉड्यूल्सचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये आणि कंत्राटदारांसोबत काम सुरू करण्याकरिता आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षण अध्यापनाची रचना करण्यात आली आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, तसेच करिअर समुपदेशन आणि प्लेसमेंट सहाय्य देखील मिळेल.