प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पंडित जवाहरलाल नेहरूंना विरोधक कायम बदनाम करतात. कारण पंडित नेहरू केवळ पंतप्रधान नव्हते तर विचारवंत होते. त्यांनी देशाला प्रगतीवर नेण्याचे काम केले. नव्या पिढीला ही बाब सांगण्यास आपण कमी पडत आहोत. समाजमाध्यमावर होणार्या जोरदार विरोधी प्रचारामुळे आपण काँग्रेसचा विचार रूजविण्यास कमी पडत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला काँग्रेसचा इतिहास सांगा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. इंटक आणि पनवेल शहर काँगे्रसचा कार्यकर्ता मेळावा पनवेलमध्ये फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पटोले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी काँग्रेस इंटकचे चंद्रकांत छाजेड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जाते, काँग्रेसने काय केले, असा प्रश्न उपस्थित करून नाना पटोले यांनी काँग्रेसमुळे देशाची प्रगती कशी झाली याचा पाढा वाचला. स्वातंत्र्यानंतर अवघ्या 50 गावांमध्ये वीज पोहोचली होती. आता प्रत्येक गावात वीज आहे, इंटरनेटक्रांती झाली आहे. परंतु, आम्ही काँग्रेसचा इतिहास तोंडी सांगायला कमी पडतो, अशी कबुली पटोले यांनी दिली. तुमच्या आजोबा, वडील काँग्रेसमुळे शिक्षण घेऊ शकले, त्यांना नोकरी लागली. आपण नव्या पिढीला हे सांगितले पाहिजे. विरोधकांना इतिहास इतरांना बदनाम करण्याचा आहे, आणि वर्तमान देश विकण्याचा आहे, काँग्रेसने मेहनतीने उभ्या केलेल्या संस्था भाजपा विकत आहे. देशाची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, हादेखील काँग्रेसचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पटोले यांनी यावेळी बोलताना केले.