| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग-रेवस मार्गावर सोमवारी (दि. 24) रोजी रात्री11.45 च्या सुमारास भीषण अपघात झाला, या झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली, तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, सोमवार दि. 24 रोजी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास सारळ- म्हात्रोळी येथील वैजयंती दशरथ पाटील या आपल्या वाहनचालक राजू नागर सोबत अलिबाग-रेवस मार्गावरून रेवस बाजूकडून अलिबागकडे स्विफ्ट वाहनाने जात असताना धोकवडे फाटा येथे आल्यानंतर अचानक चालकाचे नियंत्रण सुटून वाहन डाव्या बाजुला रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये वैजयंती दशरथ पाटील व वाहन चालक राजू नागर हे दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मांडवा सागरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, यामध्ये उपचारादरम्यान वैजयंती पाटील, रा. सारळ – म्हात्रोळी, ता. अलिबाग यांचे निधन झाले, तर वाहन चालक राजू नागर(पूर्ण नाव माहीत नाही), सध्या रा. सारळ, मूळ रा. उत्तरप्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी वाहन चालकावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कामोठे – पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वाहन चालकावर मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अपघाताबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पो. ह. वैभव पाटील हे करीत आहेत.