| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील बहुचर्चित सागरी किनारा मार्गावर शनिवारी (दि.8) रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मोटर चालवत असलेला तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गार्गी चाटे (19) असे मृत तरुणीचे नाव असून, ती प्रभादेवी परिसरात राहात होती. ती मूळची नाशिकच्या गंगापूर येथील रहिवासी असून, दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. संयम साकला (22) या तरुणासह गार्गी प्रभादेवी येथून शनिवारी रात्री उशिरा ‘स्विफ्ट’ मोटरीने मरिन ड्राईव्हच्या दिशेने जात होते. सागरी किनारा मार्गावरील हाजी अलीच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार लोखंडी गजांना धडकली व पलटी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, कोस्टल रोडवरुन जाणाऱ्या काही वाहन चालकांनी गार्गी चाटे आणि संयम साकला यांना गाडीतून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार लोखंडी रेलिंगला धडकून पलटी झाल्यामुळे गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच गार्गीचा मृत्यू झाला. तर संयम साकला याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सध्या दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ताडदेव पोलिसांकडून हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास केला जात आहे. त्यासाठी कोस्टल रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. कार चालवणारा संयम साकला सीएचे शिक्षण घेत होता. अपघातावेळी कार वेगात असल्याने त्याने मद्यप्राशन केले होते का, अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र, पोलिसांनी संयम साकला याने मद्यप्राशन केले नव्हते, असा निर्वाळा दिला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.