। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. रात्री, अपरात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी कुत्र्यांची झुंड आक्रमकपणे फिरत असतात. अनेक भागात दुचाकीस्वार आणि पादचार्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. तसेच, परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिसत असून द्रोणागिरी नोड येथील झोपडपट्टीत राहणार्या अमित सुंदरबन या पाच वर्षाच्या मुलाच्या पायाला कुत्र्यांनी चावा घेण्याची घटना (दि.12) घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक महादेव कासकर यांनी त्या मुलाला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेतले आहे. एकंदरीत कुत्र्याच्या उच्छादामुळे 2024-25 यावर्षाच्या कालावधीत सुमारे 1 हजार 700 श्वानदंशाच्या घटनाची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रानसई या आदिवासी वस्तीवर श्वानदंशामुळे आदिवासी नागरिक दगावल्याची घटना घडली होती. तसेच, आवरे डोंगरातील वन्यप्राणी बरोबर जेएनपीए रुग्णालयातील डॉक्टर व नागरिकांना श्वानदंश झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात आहे.