। कोर्लई । वार्ताहर ।
गेल्या अनेक महिन्यांपासून मुरुडसह तालुक्यातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत असून अनेकांना आतापर्यंत श्वानदंशाला सामोरे जावे लागले असून नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषद प्रशासन दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करणार काय ? असा सवाल जनमानसातून विचारला जात आहे.
मुरुड तालुका तसेच समुद्र किनारी गेल्या अनेक दिवसांपासून विशेष करून सकाळच्या वेळेत भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत समुद्र किनारी फिरायला (माॅर्निंग वाॅकला) जाणा-या नागरिकांची व पर्यटकांची डोकेदुखी ठरत आहे. मुरुडमध्येदेखील श्वानदंश झाल्याच्या घटना ताज्या असून कोळीवाडा परिसरात रोज एकतरी श्वानदंश झाल्याची घटना घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यासाठी संबंधित नगरपरिषद प्रशासनाकडून पाहाणी करण्यात येऊन शहानिशा करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.







