एसटी स्थानकात भुरट्या चोरांची दहशत

| पनवेल | वार्ताहर |

कोकणचे प्रवेशद्वार असल्याने प्रवासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेल्या पनवेल एसटी स्थानकातून दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या स्थानकातून लांब पल्ल्यासह स्थानिक परिसरातील सेवा दिली जात असल्याने प्रवाशांची गर्दी असलेल्या स्थानकाला भुरट्या चोरांकडून लक्ष्य केले जात आहे.

पनवेल एसटी स्थानक हे मध्यवर्ती स्थानक असल्याने येथे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील गाड्या येतात. याशिवाय या स्थानकावरून मुंबई, ठाणे, कल्याण तसेच खेडोपाड्यातही गाड्या सुटतात. त्यामुळे हजारो प्रवाशांची दररोज या स्थानकातून ये-जा होत असते. ज्येष्ठ नागरिक, महिलांसह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी येथून प्रवास करतात. त्यामुळे गर्दीचे स्थानक म्हणून परिचित असलेला हा परिसर सध्या भुरट्या चोरांसाठी उपयुक्त ठरत आहे. गेल्या काही दिवसात पनवेलच्या एसटी स्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. प्रवासासाठी होणार्‍या गर्दीचा फायदा घेत पाकीटमारीसह महिलांच्या अंगावरील दागिने पळवण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून एसटीचे आगार व्यवस्थापकदेखील चोरीच्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत.

पोलिस चौकी असून नसल्यासारखी

पनवेल एसटी आगारातील पोलिस चौकी आहे. बस स्थानकापासून लांब असलेल्या शौचालयाच्या बाजूला ही चौकी आहे. अशातच या चौकीच्या बाजूला गाड्या उभ्या केल्या जात असल्याने कोणालाही याबाबतची काही माहिती नाही. त्यामुळे अनेकदा चोरीच्या घटना समजल्यानंतर तक्रार करण्याची तसदीही प्रवाशांकडून घेतली जात नाही.

Exit mobile version