। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्यावतीने आयोजित चर्चासत्रात संवाद साधताना, तालिबान्यांच्या ताब्यातील अफगाणिस्तानातून कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा भारतीय सेनेचे सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी दिला आहे. याप्रसंगी पुढे संवाद साधताना, क्वाडच्या सदस्य देशांनी दहशतवादाविरोधातील वैश्विक लढ्याला अधिक बळ देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलेे. तसेच दहशतवादमुक्त वातावरणासाठी भारत कटिबद्ध असल्याचे नमूद करत संभाव्य धोक्यासाठी आमचा आपत्कालीन आराखडा तयार आहे. अफगाणिस्तानातून परतणारी मंडळी तालिबान्यांकडून होणार्या छळाबाबत आम्हाला सांगत असून गेल्या वीस वर्षांत त्यांच्या वागणुकीत काडीमात्र फरक पडलेला नाही. फक्त भागीदार बदलले आहेत, असे रावत म्हणाले. यावेळी अमेरिकेचे भारत-प्रशांत आघाडीचे प्रमुख डमिरल जॉन क्विलिनो देखील उपस्थित होते. आपल्या वक्तव्यात त्यांनी भारताला सामोरे जाव्या लागणार्या समस्यांचाही उल्लेख केला. त्यांच्या संवादाचा महत्तम रोख हा चीनच्या आक्रमक वर्तनाच्या दिशेने होता.