सकाळ आणि दुपार सत्रात होणार परीक्षा
| खास प्रतिनिधी | रायगड |
डीएड आणि बीएड उत्तीण झालेल्यांना जर का सरकारी सेवेत शिक्षक म्हणून यायचे असेल त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (2024) 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 9 सप्टेंबर 2024 रोजी परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात इ. 1 ली ते 5 वी व इ. 6 वी ते इ. 8 वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षकपदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 एवढा कालावधी मिळणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा ते एकदरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे.