| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रातील पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, तळोजा व खारघर नागरी वसाहतीमधील पावसाळापूर्वीची कामे आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे अवकाळी झालेल्या पावसाने पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक नागरी भागात पाणी साचल्याने व घरात पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे, तसेच छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. ही बाब लक्षात घेता शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्यावतीने पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांच्या दालनात बैठक घेऊन सदारचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
कामोठे येथील रस्त्यालगतची तसेच गार्डन व इतर ठिकाणच्या वृक्षांची छाटणी करणे, ड्रेनेज लाइन सफाई व गाळ काढणे, घनकचरा रोजच्या रोज उचलणे, शहरातील अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्जची शहानिशा करून अनधिकृत व असुरक्षित होर्डिंग्जवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, दिपक घरत, अवचित राऊत, प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, सूर्यकांत म्हसकर, रामदास गोवारी, प्रदीप केणी, संतोष गोळे, नंदू घरत, गणेश खांडगे उपस्थित होते.