। चिपळूण । प्रतिनिधी ।
रामपूर मार्ग ताम्हाणे परिसरात अतिवृष्टी व वादळवार्यामुळे देवखेरकी येथे चार, तर डूगवे येथे एक असे एकूण पाच महावितरणचे विजेचे पोल पडले होते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गेले तीन ते चार दिवस या परिसरात अंधार होता. येथील 33 के.व्ही. मुख्य वाहिनीवर चिपळूण मार्गताम्हणे विद्युत पोल लाईनवर पडली होती. तसेच, रिगल कॉलेज डोंगरावरील पोलावर झाड पडले होते. तर, 11 के.व्ही. मालघर लाईनवरील विद्युत पोलावर झाडी व फांद्या आल्या होत्या. महावितरण विद्युत कंपनी मार्गताम्हाणे शाखेच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेऊन नवीन विद्युत पोल उभे केले आणि विद्युत पुरवठा पूर्ववत केला आहे. त्याचबरोबर रामपूर मार्गताम्हाणे येथील ग्राहकांना तीन महिने विद्युत बिले मिळाली नव्हती, त्याचे वितरण नुकतेच करण्यात आले. या परिसरात एकूण 3 हजार 250 ग्राहक असून 30 लाखांची थकबाकी आहे. काही ग्राहकांनी ऑनलाइन विद्युत बिले भरली आहेत. परंतु, नवीन बिले देताना वीज बिले भरली त्याची रक्कम वजा केलेली नाही. त्यामुळे विद्युत बिलाची रक्कम लवकरात लवकर भरावी, असे आवाहन मार्गताम्हाणे शाखा अभियंता प्रविण राऊत यांनी केले आहे.