आदित्य ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध केला आहे. देवनारची कचराभूमी धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचराभूमीवरील कचर्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे.
धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना घरे देण्यासाठी धारावी प्राधिकरणाने देवनार कचराभूमीची जागा मागितली आहे. या कचराभूमीवरील जुने कचर्याचे डोंगर साफ करून जमीन लवकरात लवकर रिकामी करून देण्याचे आदेश राज्य सरकारने पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी पालिकेला 3000 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांवर कचरा शुल्क लावून तो निधी देवनारचा कचरा साफ करण्यासाठी वापरला जाणार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. हा भूखंड मुंबईकरांच्या पैशातून साफ करून संबंधित व्यावसायिकाता देण्यात येणार आहे. त्यामुळे या धोरणाचा रस्त्यावर उतरून निषेध करू असा इशाराही त्यांनी दिला.