| तळा | वार्ताहर |
तळा बाजारपेठेत मच्छी मार्केट लगत असलेल्या नगरपंचायतींच्या गाळ्यांसमोरील वाढीव बांधकाम अखेर ठेकेदाराकडून हटविण्यात आले आहे.
तळा बाजारपेठेत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामाची माहिती नसलेल्या तसेच अनुभव नसलेल्या सब कॉन्ट्रॅक्टर कडून करण्यात आल्याने मच्छी मार्केट येथील नगरपंचायतीच्या गाळ्यांसमोर असलेल्या रस्त्याची लेव्हल चुकली व यामुळे या ठिकाणी पाणी साचून राहू लागले. हे पाणी साचू नये यासाठी संबंधित सब ठेकेदाराने या ठिकाणी वाढीव बांधकाम केले होते. यामुळे बाजारपेठेतील रस्ता अरुंद होऊन वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. याबाबत प्रसारमाध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर मुख्य ठेकेदाराकडून सदर वाढीव बांधकाम हटविण्यात आले आहे.यामुळे रस्त्याची लांबी वाढली असून नागरिकांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास काहीसा कमी होणार आहे.