। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेले ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी खाली उतरत असताना एकाचा पाय घसरल्याने मोठा थरारक प्रसंग मंगळवारी (दि.8) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एक गंभीर जखमी झाला.
गगनगिरी ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी खोपोली शहरातील झेनिथ धबधब्याच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यामधील एकाचा पाय घसरल्याने तो डोंगरावरून कोसळला तर दुसरा घाबरून कोसळला. यामधील रोनक मेहता (वय 16, रा.अरिहंत टॉवर), क्रिशना गोस्वामी (वय 18, रा.आशियाना टॉवर) हे जखमी जखमी झाले. ते दोघे निर्मनुष्य ठिकाणी जखमी अवस्थेत पडले असताना ग्रुपमधील एकाने हेल्पलाईनवर संपर्क केला. त्यावेळी मदतीसाठी पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली.
जखमींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. रोनक मेहता याचा हात फ्रॅक्चर व कंबरेला मार लागल्यामुळे जाखोटीया हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.