जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्राचीन लेण्यांची दुरवस्था, इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचा सूर
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
रायगड जिल्ह्याला निसर्गसोबतच सांस्कृतिक तथा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र या वारसदारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील प्राचीन लेण्यांची दुरवस्था झाली असून, याबाबत इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.

जिल्ह्यातील प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशविदेशातील अभ्यासक दौरे देखील करत असतात. प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणार्‍या या वास्तू नामशेष होण्याची भिती त्यामुळे त्यांचे जतन व संगोपन होण्याची अतिशय आवश्यकता आहे. दरम्यान उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी व विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने लेणी प्रेमी व पर्यटकात नाराजी दिसून येते.ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज असल्याचे सांगत इतिहास अभ्यासक व पर्यटकांची मागणी करीत आहेत.

ठाणाळे लेणी
पालीपासून ठाणाळे हे गाव 15 किमी अंतरावर आहे. ठाणाळे या गावी येण्यासाठी नाडसुर पर्यंत एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. नाडसुर ते ठाणाळे हे 2 कि.मी. अंतर असून तेवढेच अंतर लेण्याकडे जाण्यासाठी चालावे लागते. ठाणाळे गावच्या पूर्वेकडे असलेल्या जंगलामध्ये ही लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणातात. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही येथे आश्रय घेतला होता.

नेणवली व चांभार लेणी
खडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेण्या आहेत. लेण्याचा मार्ग या दोन्ही गावापासून खरबाच्या वाटेने घनदाट अशा लेण्या डोंगरांमध्ये जातो लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत व येथील जंगल राखीव वनक्षेत्र आहे. तेथे बिबट्याचे वास्तव देखील आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या लेणी समूहात एकूण 21 लेण्या आहेत. काही लोक पूर्वापार या लेण्यांना पांडवलेणी म्हणूनच संभवतात.

गोमाशी लेणी

गोमाशी येथे बौद्ध लेणी समूह आहे. त्याला काही लोक भृगु ऋषींचे लेणी देखील संबोधतात. गोमाशी गावाजवळ सरस्वती नदीकाठी खोंडा नावाचा डोंगर आह. या डोंगरातील एका घळीत घळईत 1.5 मीटर उंचीची भृगु ऋषीं प्रतिमा कोरण्यात आली आहे. मात्र ही प्रतिमा गौतम बुद्धांची आहे असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हे ठिकाण म्हणजे नागोठणे खाडीमार्गे ताम्हणी घाटात मावळात जाणार्‍या मार्गावरील एक लेणे आहे. या लेण्यांकडे जायचे असेल तर पाली पासून गोमाशी अंतर 14 किमी आहे. गोमाशी गावापर्यंत एसटीची सोय आहे. या लेण्यांमध्ये देखील मोठी पडझड झाली आहे. लेण्यांपर्यंत जाणार्‍या मार्गाची देखील दुरवस्था झाली आहे.

Exit mobile version