पुण्याच्या वालाच्या शेंगांवरच समाधान
| उरण | प्रतिनिधी |
रायगड-उरण तालुका पोपटी या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र सध्या उरण तालुक्यातील रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे. फुंडे महाविद्यालयातील 1998-99 मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कोप्रोली येथे एकत्र येऊन रविवारी (दि.11) आपल्या विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पोपटीचा आनंद हा गाणी गुणगुणत, हसत-खेळत, गप्पा, मज्जा-मस्ती करत लुटला.
वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या उरणात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली असली तरीसुद्धा पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगाच वापरल्या जात आहे. रायगडसह उरणच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र सध्या येथील गावठी शेंगा अजुन तयार झाल्या नसल्याने पुण्यावरुन आलेल्या शेंगावरच खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे. अजून साधारण पंधरा-वीस दिवसानंतर तालुक्यातील गावठी वाल तयार होऊ लागतील आणि खऱ्या अर्थाने पोपटीला ती विशिष्ठ चव येणार आहे.
विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजुन केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच रायगड-उरणमध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाण-घेवाणही होते. अशातच फुंडे महाविद्यालयात 1998-99 मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रविवारी पोपटी संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पोपटीचा आनंद हा गाणी गुणगुणत हसत, खेळत, गप्पा, मज्जा मस्ती करत लुटला. यावेळी सर्व सहकाऱ्यांना एकत्र आणण्याचे काम आदर्शवत विद्यार्थी मेघा भोईर, संजीवनी म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, अलंकार म्हात्रे, मेघनाथ पाटील, संध्या घरत, उत्तम पाटील, गंधार पाटील, प्रभाकर गावंड, गिरीश पाटील, महेंद्र घरत, दिनेश म्हात्रे, रुपाली म्हात्रे, सुरेखा म्हात्रे, दमयंती पाटील, रंजित माळी, मनोजकुमार ठाकूर, सुवर्णा पाटील, राजेंद्र पाटील, विनोद ठाकूर, ज्योत्स्ना पाटील, प्रसाद पाटील, नवनीत पाटील, नितीन नारंगीकर यांनी केले.







