Ahmedabad Plane Crash: मैथिली पाटीलच्या आईचा आक्रोश

वर्ष उलटले, अहवाल गायब; मृतांच्या कुटुंबीयांना न्याय कधी?

| उरण | प्रतिनिधी |

माझी मुलगी आता कधीच परत येणार नाही, हे मी मान्य केले आहे. पण ज्या दुर्घटनेत 260 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्या दुर्घटनेचे खरे कारण तरी देशाला कळायला नको का? एक वर्ष उलटले, पण अजूनही आम्हाला सांगितले जात नाही की आमची लेकरं नेमकी कशी मृत्युमुखी पडली. हा अपघात होता की घातपात? दोष कोणाचा होता? आणि त्यावर कारवाई का होत नाही? अशा शब्दांत एअर इंडिया विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावची कन्या मैथिली पाटील हिच्या आई प्रमिला पाटील यांनी आपल्या मनातील संताप आणि वेदना व्यक्त केल्या.

12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे एआय-171 हे विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले आणि अवघ्या काही सेकंदांत 260 जणांचा जीव गेला. या भीषण दुर्घटनेत पनवेलची कन्या आणि एअर इंडियाची हवाई सुंदरी मैथिली पाटील हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण देश हादरला, सरकारने चौकशीचे आदेश दिले, तज्ज्ञ समित्या स्थापन झाल्या, मोठमोठी आश्वासने देण्यात आली; पण एक वर्ष उलटूनही दुर्घटनेचे नेमके कारण जनतेसमोर आलेले नाही.

मैथिली ही सामान्य कुटुंबातील मुलगी होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून तिने हवाई सेविका होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली होती. भावंडांच्या शिक्षणाची, आई-वडिलांच्या आधाराची स्वप्ने तिने पाहिली होती. पण एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले. विमान कोसळले आणि पाटील कुटुंबाचे संपूर्ण विश्वच काळोखात बुडाले.

आजही घरातील प्रत्येक कोपऱ्यात मैथिलीच्या आठवणी आहेत. तिचे फोटो आहेत, तिचा आवाज आहे, तिच्या स्वप्नांच्या कथा आहेत. पण ती नाही आणि तिच्या मृत्यूचे कारणही नाही. याच वेदनेने कुटुंबीय अस्वस्थ आहेत. दुर्घटनेनंतर अनेक तर्क-वितर्क समोर आले. कोणी तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले, कोणी मानवी चुकीची शक्यता व्यक्त केली, तर काहींनी घातपाताचाही संशय व्यक्त केला. मात्र, या सर्व चर्चांमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना अजूनही अधिकृत उत्तर मिळालेले नाही.
देशाच्या विमान सुरक्षेचा प्रश्न, 260 निष्पाप जीवांचा प्रश्न आणि शेकडो कुटुंबांच्या न्यायाचा प्रश्न आता सरकारने अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.

मृत्यूचे सत्य देशासमोर मांडा
आज दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून एकच मागणी होत आहे. आमची लेकरं परत येणार नाहीत, पण त्यांच्या मृत्यूचे सत्य तरी देशासमोर मांडा. दोषी कोण असेल त्याला शिक्षा करा. कारण सत्य दडपले गेले, तर उद्या आणखी कित्येक कुटुंबांवर अशीच वेळ येऊ शकते.
Exit mobile version