| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर 3, 4, 8, 9, 10, 11 परिसरात जागोजागी महानगर कंपनीच्या गसचे पाईप लाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. येथील खोदकाम करताना पुन्हा सेक्टर 11 येथील अरुणोदय क्लिनिकच्या बाजूला महानगर गॅसचे कामे रस्त्यावर सुरु असताना जेसीबीने खोदकाम करताना पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेकडो लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे.
या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे या परिसरात भूमीगत रस्त्याखालून जाणाऱ्या जलवाहिन्या फुटून हजारो लीटर पाणी वाया जाण्याच्या घटना या परिसरात वारंवार घडत असतात. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सेक्टर 3 येथील निल रेसिडेंसी सोसायटीसमोर जलवाहिनी फुटून हजारो लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. तसेच दहा महिन्यांपूर्वी नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेसमोरच्या रस्त्यावर सिध्द विनायक सोसायटीसमोर रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी फूटून हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. यामुळे येथिल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन पनवेलचा पाणीप्रश्न जटिल झाला असून, पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवीन पनवेलमध्ये बऱ्याच भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे सिडको प्रशासनाच्या व महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे पाईपलाइन फुटून हजारो लीटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. येत्या निवडणुकीत हा पाणीप्रश्न चांगलाच गाजणार आहे.
जलवाहिनी पुन्हा फुटली; हजारो लीटर पाणी वाया
