नगरपंचायतीने दखल घेण्याची मागणी
। पाली । वार्ताहर ।
ऐतिहासिक वारसा असलेल्या पाली शहरातील तलावांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हटाळेश्वर तलावाचा परिसर अस्वच्छ झाला आहे. अतिक्रमण, कचरा व सांडपाण्यामुळे तलावाचा श्वास गुदमरत आहे. यामुळे तलाव प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे.
काही वर्षांपूर्वी पाली शहरातील रहिवाशांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून तलावांकडे पाहिले जात असे. मात्र, सध्या या तलावांची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाली शहरात हटाळेश्वर तलावाची तेथील परिसरातील नागरिकांनी अक्षरश: कचराकुंडी केली आहे. ग्रामपंचायतीची कचर्याची गाडी घरापर्यंत येत असतानाही तेथील नागरिक कचरा तलावात टाकत आहेत. तर, काही नागरिकांनी शौचालयाच्या पाइपलाइन तलावात सोडल्या आहेत.
याकडे पाली नगरपंचायतीने लक्ष का देत नाही आणि कचरा टाकणार्यांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून केला आहे. शहरीकरणामुळे तलावांची संख्या कमी होत असून, सध्या अस्तित्वात असलेल्या तलावांची ही पुरती दुरवस्था झाली आहे. यासाठी शहरातील तलावाचे नगरपंचायतीने सुशोभिकरण करावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तलावाची झाली कचराकुंडी
पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जात असे. त्या तलावाची लोकांनी कचराकुंडी केली आहे.लवकरात लवकर या तलावांचे सुशोभिकरण करावे, जेणेकरून परिसरातील नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बालोद्यान उपलब्ध होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेली अनेक वर्षे तलावाचे सुशोभिकरण केले नाही. या तलावातील गाळ काढला तर त्यातील पाण्याचा उन्हाळ्यात रहिवाशांना वापर करता येऊ शकते. तलावाकाठच्या बाजूला कचरा दिसत आहे. कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
-वसंत दंत, व्यापारी
पाली शहरातील काही तलावांचे सुशोभिकरण करण्यात आले असून, हटाळेश्वर तलावाचेदेखील लवकरच सुशोभिकरण करू.
गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली नगरपंचायत