फटाक्याच्या ठिणगीने संसाराची राख

सिद्धिविनायक इमारतीतील आगीने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बिल्डर, अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

| पेण | प्रतिनिधी |

दिवाळीच्या फटाक्याची एक ठिणगी पेणमधील तीन मजल्यांवरील रहिवाशांच्या संसारांची राखरांगोळी करून गेली. उत्कर्ष नगर येथील सिद्धिविनायक इमारतीला लागलेल्या आगीत तीन फ्लॅटचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र अग्निशमन दलाच्या वाहनाला इमारतीपर्यंत पोहोचताना येणारे अडथळे आणि बांधकाम परवानग्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

8 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीनिमित्त उडविण्यात आलेला फटाका चौथ्या मजल्यावरील श्री. प्रेम तेलवणे यांच्या फ्लॅटमध्ये पडल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची झळ पाचव्या मजल्यावरील श्री. विजय प्रसाद यांच्या फ्लॅटला, तर सहाव्या मजल्यावरील श्री. अमित विठोबा निंगावले यांच्या फ्लॅटच्या किचनलाही बसली. घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच पेण अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेदरम्यान अग्निशमन वाहनाला इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाल्याची चर्चा आहे. परिसरात अतिक्रमण असल्याने अग्निशमन वाहनासाठी पुरेसा मोकळा रस्ता उपलब्ध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात असताना आपत्कालीन प्रवेशमार्ग, अग्निसुरक्षा आणि आवश्यक मोकळ्या जागांची प्रत्यक्षात पूर्तता होते का, याची तपासणी कोण करणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

सिद्धिविनायक इमारतीच्या बांधकाम परवानगीची आणि प्रत्यक्ष बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित बिल्डरने मंजूर आराखड्यानुसार बांधकाम केले आहे का, अग्निशमन विभागाची आवश्यक मान्यता घेतली होती का, अग्निशमन वाहनासाठी प्रवेशमार्ग उपलब्ध ठेवला आहे का आणि परिसरातील अतिक्रमणाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले का, याची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून मंजूर आराखडा, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि बांधकामाची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित बिल्डर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या दुर्घटनेत अग्निशमन विभागाचे प्रमुख अभिजीत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली चालक अभिषेक बंगाले, समीर म्हात्रे आणि अग्निशामक सागर वर्तक, सूरज भोईर, सूरज कुरुंगळे, परेश म्हात्रे, विशाल बांमणे, प्रसन्ना पाटील, चंद्रकांत गावंड आणि स्वप्निल म्हात्रे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तर पोलीस विभागाकडून झडख विक्रम नवरखेडे, झडख शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल नवीन पाटील, चंद्रकांत दणाने आणि होमगार्ड जितेंद्र पानसकर यांनी आवश्यक कार्यवाही केली.

या आगीत जीवितहानी झाली नाही, ही समाधानाची बाब असली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल, तर जबाबदारी कोणाची? पेण नगरपालिकेने सिद्धिविनायक इमारतीची तातडीने पाहणी करून अतिक्रमण, बांधकाम परवानगी आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची चौकशी करावी. दुर्घटनेनंतर धावपळ करण्यापेक्षा नागरिकांच्या जीविताची सुरक्षा आधीच सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version