Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

रायगड/पोलादपूर | जिल्हा प्रतिनिधी |

दागिने बळकावण्यासाठी वयोवृद्ध चुलत मावशीचे अपहरण करून भाच्यांनीच खून केला. ही घटना सारळ आदिवासीवाडी ते तिनविरा दरम्यान घडली असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींकडून देण्यात आली. आरोपींच्या कबुलीजबाबानंतर गुरुवार, दि. 4 जून रोजी तब्बल 100 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मांडवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा लक्ष्मण पाटील (85) असे या वयोवृद्ध मृत महिलेचे नाव आहे. ही महिला सारळ येथील आदिवासीवाडी येथे एकटीच राहात होती. गेल्या काही दिवसांपासून ती महिला बेपत्ता होती.त्यामुळे हरविल्याची तक्रार मांडवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला. त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी केली. अखेर तिनवीरा येथील दोन तरुणांची नावे पोलिसांसमोर आली. पोलिसांनी या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे या दोघांनी वयोवृध्द महिलेचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांचा बळावला. खाकी वर्दीचा दणका मिळाल्यावर दोघेही पोपटासारखे बोलू लागले. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आला. या पथकामार्फत तपासाची सूत्रे वेगात हलविण्यात आली.

वयोवृद्ध महिला ही आरोपींची चुलत मावशी होती. तिच्याकडे लाखो रुपयांचे दागिने होते. ते दागिने बळकाविण्यासाठी त्यांनी वयोवृद्ध महिलेचे अपहरण केले. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. खून केल्याची माहिती उघड होऊ नये, म्हणून त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी आंबेनळी घाटातील बावली टोक ते दाभिळ टोकदरम्यानच्याखोल दरीत महिलेचा मृतदेह टाकून दिल्याचे कबूल केले. हा प्रकार 31 मे रोजी सकाळी दहा ते 2 जून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आला.

आरोपींच्या माहितीनुसार अलिबाग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, घाटातील धोकादायक कडे, दाट झाडी आणि खोल दरीमुळे मृतदेह शोधणे मोठे आव्हान ठरले. यासाठी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या सदस्यांची मदत घेण्यात आली. रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव यांना पोलादपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर दोन्ही टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. सुमारे दीड तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर 100 फूट खोल दरीत एका काळ्या रंगाच्या पिशवीत मृतदेह आढळून आला. त्यानंतर रोप आणि विशेष साहित्याच्या साहाय्याने रेस्क्यू टीमचे सदस्य दरीत उतरले. दरम्यान, पावसानेही हजेरी लावल्याने अडचणी वाढल्या होत्या. तरीही जीवाची पर्वा न करता जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर मृतदेह सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या धाडसी मोहिमेत सुनीलबाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, ऋषिकेश जाधव, अजित जाधव, मुन्ना उतेकर, ओमकार सोनवणे, शरद सावंत, निखिल सावंत आणि संकेत सावंत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अनदर्श हिराजी शेडगे (32) व रितेश नरेश लोहार (20) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. अनदर्श हा पिकअप चालक असून, रितेश हा गार्डनिंगची कामे करतो. मात्र, अधिक पैसे मिळविण्याबरोबरच दागिन्यांच्या हव्यासापोटी त्यांनी चुलत मावशीचा खून केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीमध्ये असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबेनळी घाटाचा वापर झाल्याने हा घाट पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही अशा अनेक गुन्ह्यांमध्ये मृतदेह घाटातील खोल दऱ्यांमध्ये फेकून दिल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे कशेडी आणि आंबेनळी घाट किल अँड थ्रोसाठी कुप्रसिद्ध होत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
Exit mobile version