पर्यटकांविना किनारे पडले ओस

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

दहावी, बारावीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटनाचा हंगाम सुरू होईल असे संकेत मिळत होते. परंतु, गेल्या शनिवार, रविवारीदेखील मुरूड तालुक्यात पर्यटक फिरकलेच नाहीत, अशी माहिती मुरूडमधील हिरा रेसीडन्सीचे मालक महेंद्र पाटील यांनी दिली. सोमवार, मंगळवार, बुधवारीदेखील पर्यटकांचा मागमूस दिसत नव्हता. मुरूड, काशीद, नांदगाव बीचवर पर्यटकांची ओहोटी स्पष्टपणे दिसून येत होती.

या शनिवार, रविवारसाठीदेखील पर्यटकांचे बुकिंग बुधवारपर्यंत झालेले नसल्याची माहिती लॉजिंग मालक महेंद्र पाटील, मनोहर बैले आदींनी दिली. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय परीक्षा एप्रिल महिन्यात असल्याने याचादेखील हा परिणाम असू शकतो, असे मत या क्षेत्रांतील मंडळींनी व्यक्त केले आहे. प्रसिद्ध काशीद बीचवरदेखील पर्यटकांची तुरळक वर्दळ दिसून येत आहे. मुरूड बीचवरील वाळूवर शतपावली करणार्‍या स्थानिक मंडळींची उपस्थिती दिसून आली. रायगडातील समुद्रकिनारे पर्यटकांची आवडती ठिकाणे बनली असल्याचे पाहिले जात आहेत. परंतु उन्हाळी पर्यटनाचा हंगाम सुरू होऊनही पर्यटकांनी पाठ फिरविल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. महाबळेश्‍वर, पांचगणी, माथेरान, इगतपुरी आदी थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असून, त्या पार्श्‍वभूमीवर रायगडातील समुद्रकिनारी पर्यटकांची ओहोटी दिसून येत आहे.

रेड्डी- रेवस सागरी महामार्गाचे काम मंदगतीने सुरू असून, या मार्गावर छोट्या-मोठ्या पुलांचे कामदेखील थंडावले आहे. रायगडचे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर, आदगाव आदी पर्यटन समुद्रकिनारे आगामी काळात गेटवे वरून रो-रो सेवेने अधिक प्रभावीपणे जोडण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या सर्वांचे काम मंदगतीने सुरू असून, याकडे अधिक प्राधान्याने लक्ष घालावे लागेल. जलमार्गाने हे किनारे सुरक्षितपणे जोडले गेले पाहिजेत. या सर्व भागात वर्षभर पर्यटकांची वर्दळ राहील याची सर्वंकष काळजी घेतल्यास सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी कोकणातील किनारे पर्यटन हब होण्यास वेळ लागणार नाही, शिवाय समुद्रकिनारी पर्यटकांचा कधीही शुकशुकाटदेखील राहणार नाही हे निश्‍चितच.

Exit mobile version